इयत्ता 9वी विज्ञान | आम्ल, आम्लारी व क्षार | स्वाध्याय प्रश्नोत्तरे
पाठ 5 : आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय
प्रश्न 1. गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
अ. क्लोराईड, नायट्रेट, हायड्राईड, अमोनिअम
उत्तर: अमोनिअम
कारण: अमोनिअम हा धनायन आहे, तर क्लोराईड, नायट्रेट व हायड्राईड हे ऋणायन आहेत.
आ. हायड्रोजन क्लोराईड, सोडिअम हायड्रॉक्साईड, कॅल्शिअम ऑक्साईड, अमोनिआ
उत्तर: हायड्रोजन क्लोराईड
कारण: हायड्रोजन क्लोराईड हे आम्ल आहे, तर उर्वरित पदार्थ आम्लारीधर्मी आहेत.
इ. ऍसिटिक ऍसिड ॲसिड, कार्बोनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड
उत्तर: ऍसिटिक ॲसिड
कारण: ऍसिटिक ॲसिड हे सेंद्रिय आम्ल आहे, तर उर्वरित सर्व अकार्बनी आम्ले आहेत.
ई. अमोनियम क्लोराईड, सोडिअम क्लोराईड, पोटॅशिअम नायट्रेट, सोडिअम सल्फेट
उत्तर: अमोनियम क्लोराईड
कारण: अमोनियम क्लोराईड हे आम्लधर्मी क्षार आहे, तर उर्वरित क्षार उदासीन आहेत.
उ. सोडिअम नायट्रेट, सोडिअम कार्बोनेट, सोडिअम सल्फेट, सोडिअम क्लोराईड
उत्तर: सोडिअम कार्बोनेट
कारण: सोडिअम कार्बोनेटचे जलीय द्रावण आम्लारीधर्मी असते, तर उर्वरित द्रावणे उदासीन असतात.
ऊ. कॅल्शिअम ऑक्साईड, मॅग्नेशिअम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड, सोडिअम ऑक्साईड
उत्तर: झिंक ऑक्साईड
कारण: झिंक ऑक्साईड हे उभयधर्मी ऑक्साईड आहे, तर उर्वरित ऑक्साईड आम्लारीधर्मी आहेत.
ए. स्फटिकरूप मोरचूद, स्फटिकरूप मीठ, स्फटिकरूप फेरस सल्फेट, स्फटिकरूप सोडिअम कार्बोनेट
उत्तर: स्फटिकरूप मीठ
कारण: स्फटिकरूप मीठामध्ये स्फटिकीकरणाचे पाणी नसते, तर उर्वरित पदार्थांमध्ये स्फटिकीकरणाचे पाणी असते.
ऐ. सोडिअम क्लोराईड, पोटॅशिअम हायड्रॉक्साईड, ऍसिटिक ॲसिड, सोडिअम अॅसिटेट
उत्तर: ऍसिटिक ॲसिड
कारण: ऍसिटिक ॲसिड हे दुर्बल विद्युत अपघट्य आहे, तर उर्वरित पदार्थ प्रबल विद्युत अपघट्य आहेत.
प्रश्न 2. पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
अ. कॉपर सल्फेटच्या 50 मिली द्रावणात 50 मिली पाणी मिळवले.
उत्तर: कॉपर सल्फेटच्या द्रावणाची संहती कमी होईल आणि निळा रंग फिकट होईल.
कारण: पाणी मिसळल्यामुळे द्रावणाचे विरलीकरण होते.
आ. सोडिअम हायड्रॉक्साईडच्या 10 मिली द्रावणात फिनॉलफ्थॅलीन दर्शकाचे दोन थेंब टाकले.
उत्तर: द्रावणाला गुलाबी रंग येईल.
कारण: फिनॉलफ्थॅलीन हा आम्लारीधर्मी माध्यमात गुलाबी रंग देतो.
इ. 10 मिली विरल नायट्रिक ॲसिडमध्ये तांब्याच्या किसाचे 2/3 कण टाकून हलवले.
उत्तर: तांबे विरल नायट्रिक ॲसिडशी अभिक्रिया करतो. कॉपर नायट्रेट तयार होते व नायट्रिक ऑक्साईड (NO) वायू बाहेर पडतो.
रासायनिक समीकरण:
3Cu + 8HNO3 → 3Cu(NO3)2 + 2NO + 4H2O
ई. 2 मिली विरल HCl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला. त्यानंतर त्यामध्ये 2 मिली संहत NaOH मिसळून हलवले.
उत्तर: HCl मुळे निळा लिटमस लाल होतो. NaOH मिसळल्यानंतर उदासिनीकरण होते.
रासायनिक समीकरण:
HCl + NaOH → NaCl + H2O
उ. विरल HCl मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साईड मिसळले तसेच विरल NaOH मध्ये मॅग्नेशिअम ऑक्साईड मिसळले.
उत्तर: MgO विरल HCl बरोबर अभिक्रिया करून मॅग्नेशिअम क्लोराईड व पाणी तयार करतो.
MgO + 2HCl → MgCl2 + H2O
MgO हे आम्लारीधर्मी ऑक्साईड असल्यामुळे विरल NaOH बरोबर अभिक्रिया होत नाही.
ऊ. विरल HCl मध्ये झिंक ऑक्साईड मिसळले तसेच विरल NaOH मध्ये झिंक ऑक्साईड मिसळले.
उत्तर: ZnO हे उभयधर्मी ऑक्साईड आहे. ते आम्लाबरोबर तसेच आम्लारीबरोबर अभिक्रिया करते.
ZnO + 2HCl → ZnCl2 + H2O
ZnO + 2NaOH → Na2ZnO2 + H2O
ए. चुनखडीवर विरल HCl टाकले.
उत्तर: चुनखडीतील कॅल्शिअम कार्बोनेट HCl बरोबर अभिक्रिया करून कॅल्शिअम क्लोराईड, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार करते. फेस येतो व CO2 वायू बाहेर पडतो.
CaCO3 + 2HCl → CaCl2 + H2O + CO2↑
ऐ. परीक्षानळीत मोरचुदाचे खडे तापवले व थंड झाल्यावर त्यात पाणी मिळवले.
उत्तर: मोरचुदाचे खडे तापवल्यावर निळ्या रंगाचे मोरचूद पांढऱ्या रंगाच्या चूर्णात बदलते. त्यात पाणी घातल्यावर ते पुन्हा निळे होते.
कारण: तापवल्यावर स्फटिकीकरणाचे पाणी निघून जाते. पाणी घातल्यावर ते पुन्हा मिळते.
ओ. विद्युत अपघटनी घटात विरल H2SO4 घेऊन त्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिला.
उत्तर: विरल H2SO4 विद्युतप्रवाह वाहण्यासाठी माध्यम उपलब्ध करून देते. ऋणाग्रावर हायड्रोजन वायू आणि धनाग्रावर ऑक्सिजन वायू तयार होतो.
प्रश्न 3. खालील ऑक्साईडचे तीन गटांत वर्गीकरण करून त्यांना नावे द्या.
दिलेली ऑक्साईड: CaO, MgO, CO2, SO3, Na2O, ZnO, Al2O3, Fe2O3
1. आम्लारीधर्मी ऑक्साईड:
CaO, MgO, Na2O, Fe2O3
2. आम्लधर्मी ऑक्साईड:
CO2, SO3
3. उभयधर्मी ऑक्साईड:
ZnO, Al2O3
प्रश्न 4. इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
अ. सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराईडची निर्मिती
सोडिअम (Na): 2, 8, 1
सोडिअमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असतो. तो इलेक्ट्रॉन देऊन Na+ आयन तयार करतो.
Na → Na+ + e−
क्लोरीन (Cl): 2, 8, 7
क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन स्वीकारून Cl− आयन तयार करतो.
Cl + e− → Cl−
Na+ व Cl− यांच्यातील विद्युतस्थिर आकर्षणामुळे आयनिक बंध तयार होतो आणि NaCl तयार होते.
आ. मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराईडची निर्मिती
मॅग्नेशिअम (Mg): 2, 8, 2
मॅग्नेशिअम बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन देऊन Mg2+ आयन तयार करतो.
Mg → Mg2+ + 2e−
क्लोरीन (Cl): 2, 8, 7
क्लोरीनचे दोन अणू प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन स्वीकारतात.
2Cl + 2e− → 2Cl−
Mg2+ आणि 2Cl− यांच्यातील विद्युतस्थिर आकर्षणामुळे आयनिक बंध तयार होतो आणि MgCl2 तयार होते.
Mg2+ + 2Cl− → MgCl2
प्रश्न 5. खालील संयुगे पाण्यात विरघळल्यास त्यांचे विघटन कसे होते ते रासायनिक समीकरणाने दर्शवा व विघटनाचे प्रमाण कमी की जास्त ते लिहा.
अ. हायड्रोक्लोरिक आम्ल (HCl)
HCl → H+ + Cl−
विघटनाचे प्रमाण: जास्त
आ. सोडिअम क्लोराईड (NaCl)
NaCl → Na+ + Cl−
विघटनाचे प्रमाण: जास्त
इ. पोटॅशिअम हायड्रॉक्साईड (KOH)
KOH → K+ + OH−
विघटनाचे प्रमाण: जास्त
ई. अमोनिआ (NH3)
NH3 + H2O ⇌ NH4+ + OH−
विघटनाचे प्रमाण: कमी
उ. अॅसिटिक आम्ल (CH3COOH)
CH3COOH ⇌ H+ + CH3COO−
विघटनाचे प्रमाण: कमी
ऊ. मॅग्नेशिअम क्लोराईड (MgCl2)
MgCl2 → Mg2+ + 2Cl−
विघटनाचे प्रमाण: जास्त
ए. कॉपर सल्फेट (CuSO4)
CuSO4 → Cu2+ + SO42−
विघटनाचे प्रमाण: जास्त
प्रश्न 6. पुढील द्रावणांची संहती ग्रॅम/लिटर व मोल/लिटर ह्या एककांमध्ये व्यक्त करा.
अ. 100 मिली द्रावणात 7.3 ग्रॅम HCl
100 मिली = 0.1 लिटर
ग्रॅम/लिटर = 7.3 ÷ 0.1 = 73 ग्रॅम/लिटर
HCl चे मोलर वस्तुमान = 36.5 ग्रॅम/मोल
मोल/लिटर = 73 ÷ 36.5 = 2 मोल/लिटर
उत्तर: 73 ग्रॅम/लिटर आणि 2 मोल/लिटर
आ. 50 मिली द्रावणात 2 ग्रॅम NaOH
50 मिली = 0.05 लिटर
ग्रॅम/लिटर = 2 ÷ 0.05 = 40 ग्रॅम/लिटर
NaOH चे मोलर वस्तुमान = 40 ग्रॅम/मोल
मोल/लिटर = 40 ÷ 40 = 1 मोल/लिटर
उत्तर: 40 ग्रॅम/लिटर आणि 1 मोल/लिटर
इ. 100 मिली द्रावणात 3 ग्रॅम CH3COOH
100 मिली = 0.1 लिटर
ग्रॅम/लिटर = 3 ÷ 0.1 = 30 ग्रॅम/लिटर
CH3COOH चे मोलर वस्तुमान = 60 ग्रॅम/मोल
मोल/लिटर = 30 ÷ 60 = 0.5 मोल/लिटर
उत्तर: 30 ग्रॅम/लिटर आणि 0.5 मोल/लिटर
ई. 200 मिली द्रावणात 4.9 ग्रॅम H2SO4
200 मिली = 0.2 लिटर
ग्रॅम/लिटर = 4.9 ÷ 0.2 = 24.5 ग्रॅम/लिटर
H2SO4 चे मोलर वस्तुमान = 98 ग्रॅम/मोल
मोल/लिटर = 24.5 ÷ 98 = 0.25 मोल/लिटर
उत्तर: 24.5 ग्रॅम/लिटर आणि 0.25 मोल/लिटर
प्रश्न 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. आम्लारीधर्मिता ह्या गुणधर्मानुसार आम्लांचे वर्गीकरण करा. प्रत्येकाचे एक उदाहरण लिहा.
1. एकक्षारी आम्ले: ज्यांच्या एका रेणूपासून एक H+ आयन मिळतो ती आम्ले.
उदाहरण: HCl
2. द्विक्षारी आम्ले: ज्यांच्या एका रेणूपासून दोन H+ आयन मिळतात ती आम्ले.
उदाहरण: H2SO4
3. त्रिक्षारी आम्ले: ज्यांच्या एका रेणूपासून तीन H+ आयन मिळतात ती आम्ले.
उदाहरण: H3PO4
आ. उदासिनीकरण म्हणजे काय? दैनंदिन जीवनातील उदासिनीकरणाची दोन उदाहरणे लिहा.
उत्तर: आम्ल आणि आम्लारी यांच्यात अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होण्याच्या अभिक्रियेला उदासिनीकरण म्हणतात.
उदाहरणे:
1. आम्लपित्त झाल्यावर आम्लारीधर्मी अँटॅसिड घेतल्याने आम्लाचे उदासिनीकरण होते.
2. आम्लीय मातीमध्ये चुनखडी किंवा चुना मिसळल्यास मातीतील आम्लाचे उदासिनीकरण होते.
इ. द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापरतात ते लिहा.
उत्तर: द्रावणाचा सामू (pH) मोजण्यासाठी pH पट्टी (pH paper) किंवा सार्वत्रिक दर्शक (Universal indicator) वापरतात.
ई. पाण्याचे विद्युत अपघटन म्हणजे काय ते सांगून विद्युतअपघटनी अभिक्रिया लिहून स्पष्ट करा.
उत्तर: पाण्यामधून विद्युतप्रवाह सोडल्यावर त्याचे हायड्रोजन व ऑक्सिजन या वायूंमध्ये विघटन होते. या प्रक्रियेला पाण्याचे विद्युत अपघटन म्हणतात.
विद्युतअपघटनी अभिक्रिया:
2H2O → 2H2 + O2
प्रश्न 8. खालील कृतींसाठी रासायनिक समीकरणे लिहा.
अ. HCl च्या द्रावणात NaOH चे द्रावण मिसळले.
HCl + NaOH → NaCl + H2O
आ. विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिसळले.
Zn + H2SO4 → ZnSO4 + H2↑
इ. कॅल्शिअम ऑक्साईडमध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिसळले.
CaO + 2HNO3 → Ca(NO3)2 + H2O
ई. KOH च्या द्रावणामधून कार्बन डायऑक्साईड वायू सोडला.
2KOH + CO2 → K2CO3 + H2O
उ. खाण्याच्या सोड्यावर विरल HCl ओतले.
NaHCO3 + HCl → NaCl + H2O + CO2↑
प्रश्न 9. फरक लिहा.
अ. आम्ल व आम्लारी
| आम्ल | आम्लारी |
|---|---|
| आम्ल पाण्यात H+ आयन देतात. | आम्लारी पाण्यात OH− आयन देतात. |
| आम्ल निळ्या लिटमसला लाल करते. | आम्लारी लाल लिटमसला निळे करते. |
| उदा. HCl | उदा. NaOH |
आ. धनायन व ऋणायन
| धनायन | ऋणायन |
|---|---|
| धनावेशित आयनाला धनायन म्हणतात. | ऋणावेशित आयनाला ऋणायन म्हणतात. |
| धनायनावर धन (+) आवेश असतो. | ऋणायनावर ऋण (−) आवेश असतो. |
| उदा. Na+, Ca2+ | उदा. Cl−, SO42− |
इ. ऋणाग्र व धनाग्र
| ऋणाग्र (Cathode) | धनाग्र (Anode) |
|---|---|
| विद्युत अपघटनात ऋणाग्र ऋण (-) असतो. | विद्युत अपघटनात धनाग्र धन (+) असतो. |
| धनायन ऋणाग्राकडे जातात. | ऋणायन धनाग्राकडे जातात. |
प्रश्न 10. खालील पदार्थांच्या जलीय द्रावणाचे वर्गीकरण सामूप्रमाणे 7, 7 पेक्षा जास्त व 7 पेक्षा कमी या गटांत करा.
दिलेल्या पदार्थ: मीठ, सोडिअम अॅसिटेट, हायड्रोजन क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, पोटॅशिअम ब्रोमाईड, कॅल्शिअम हायड्रॉक्साईड, अमोनिअम क्लोराईड, व्हिनेगार, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ, सल्फर डायऑक्साईड.
सामू = 7 :
मीठ, पोटॅशिअम ब्रोमाईड
सामू 7 पेक्षा जास्त :
सोडिअम अॅसिटेट, कॅल्शिअम हायड्रॉक्साईड, सोडिअम कार्बोनेट, अमोनिआ
सामू 7 पेक्षा कमी :
हायड्रोजन क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनिअम क्लोराईड, व्हिनेगार, सल्फर डायऑक्साईड
Comments
Post a Comment