इयत्ता १०वी मराठी कुमारभारती – कविता क्र. ४ उत्तमलक्षण | कृती प्रश्नोत्तरे | Maharashtra Board
कविता क्र. ४ – उत्तमलक्षण
(१) आकृत्या पूर्ण करा.
(अ) संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी
उत्तर :
(१) अपकीर्ती सांडावी.
(२) सत्कीर्ती वाढवावी.
(३) सत्याची वाट दृढ धरावी.
(आ) कधीही करू नयेत अशा गोष्टी
उत्तर :
(१) पुण्यमार्ग सोडू नये.
(२) पैज किंवा होड लावू नये.
(३) कुणावरही आपले ओझे लादू नये.
(४) असत्याचा अभिमान बाळगू नये.
(इ) तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा.
उत्तर :
गुण
(१) मी नियमित व्यायाम करतो.
(२) मी नेहमी सत्य बोलतो.
(३) आई वडिलांची सेवा करतो.
दोष
(१) खूप मोबाईल पाहतो.
(२) मी कधी कधी खोटे बोलतो.
(३) मला पटकन राग येतो.
(२) पुढील व्यक्तींशी कसे वागावे, असे संत रामदास म्हणतात :
(अ) तोंडाळ
उत्तर : तोंडाळासी भांडू नये.
(आ) संत
उत्तर : संतसंग खंडू नये.
(३) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा.
| गोष्टी | दक्षता |
|---|---|
| (१) आळस | (१) आळसात सुख मानू नये |
| (२) परपीडा | (२) परपीडा करू नये. |
| (३) सत्यमार्ग | (३) सत्यमार्ग सोडू नये. |
(४) काव्य सौंदर्य
(अ) खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा :
‘जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ।।’
उत्तर :
आशयसौंदर्य :
‘उत्तमलक्षण’ या श्रीदासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. त्यांपैकी या ओवीत व्यक्तीने कोणते आचरण करावे, याबाबत मार्गदर्शन केले आहे.
काव्यसौंदर्य :
समाजात वावरताना कोणाचे मन दुखवू नये, लोकांच्या भावनांचा आदर करावा, वाईट मार्गाने धन मिळवू नये आणि नेहमी चांगल्या मार्गाने जीवन जगावे, असा संदेश संत रामदासांनी या ओवीतून दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा मार्ग सोडू नये, असे ते सांगतात.
भाषिक वैशिष्ट्ये :
‘तोडू नये, जोडू नये, सोडू नये’ या शब्दांमधून सुंदर यमक साधले आहे. ओवीछंदाला साजेशी सोपी व सुबोध भाषा वापरली आहे. ‘पापद्रव्य’ आणि ‘पुण्यमार्ग’ या शब्दांमधून विरोधाभास दिसून येतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो.
(आ) ‘सभेमध्ये लाजू नये । बाष्कळपणे बोलू नये ।’ या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर :
‘उत्तमलक्षण’ या कवितेमध्ये संत रामदासांनी आदर्श व गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो नेहमी लोकांमध्ये वावरत असतो.
सभेमध्ये किंवा लोकांसमोर आपले मत मांडताना घाबरू नये. आपले विचार स्पष्टपणे मांडावेत. मात्र बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा. निरर्थक, बालिश किंवा बाष्कळपणे बोलू नये. त्यामुळे आपले हसे होणार नाही याची काळजी घ्यावी.
अशा प्रकारे सभेमध्ये आत्मविश्वासाने वागणे आणि विचारपूर्वक बोलणे हे उत्तम व्यक्तीचे लक्षण आहे, असा विचार संत रामदासांनी या ओळींतून मांडला आहे.
(इ) ‘आळसें सुख मानूं नये’ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
‘उत्तमलक्षण’ या ओव्यांमध्ये संत रामदासांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये आळस हा माणसाचा शत्रू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘आळस’ हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे काम करण्याचा उत्साह कमी होतो आणि अनेक कामे अपूर्ण राहतात. आळसामुळे माणसाची प्रगती थांबते आणि तो नाकर्ता बनतो. आळशी माणसाला समाजात मान मिळत नाही.
म्हणून दैनंदिन जीवनात आळसाला स्थान देऊ नये. नेहमी उत्साहाने व मेहनतीने काम करावे. आळसात सुख किंवा समाधान मानू नये, असा संदेश समर्थ रामदासांनी या ओळीतून दिला आहे.
Comments
Post a Comment